शनिवार, २३ जानेवारी, २०१६

लाल-परि

सकाळ होते सोनेरी
ती झोपेमधून उठते
आळस थोडा जावा म्हणून
खिडकीत उभी राहते
       खिडकीमध्ये सूर्य मग
       निरखून असा बघतो
       अन पाहून तिचे रूप
       तिला लाल-परि म्हणतो……।।

नजर कधी भिडली तर
लपून ती बसते
ढगात लपून बसला तर
उगाच मनात रुसते
       तिला असं चिडवायसाठी
       मुद्दाम असं  करतो
       खिडकीमध्ये सूर्य मग
       निरखून तिला बघतो……।।१।।

कधी ओल्या केसांनी ती
उन्हात उभी असते
जणू दवांची शाल पांघरून
प्राजक्ता थंडीत फुलते
       त्या फुलाचे शितल रूप
       डोळे भरून पाहतो
       खिडकीमध्ये सूर्य मग
       निरखून असा बघतो……।।२।।

ऊन पावसाचा खेळ झाला
तर मुद्दाम ती भिजते
ओल्या चिंब कायेने ती
सूर्याकडे बघते
       अश्या वेळी सुर्य बावरा
       लाजरा बुजरा बनतो
       ढगाआड सूर्य मग
       निरखून तिला बघतो……।।३।।

खिडकीमध्ये सूर्य रोज
निरखून असा बघतो….


अशी आहे माझी राधा

-प्रशांत भोपळे
(Date:२३/०१/२०१६)

Tag: Romantic | Marathi | Poem | Kavita | Passion

सोमवार, ११ जानेवारी, २०१६

शेवटची भेट

शेवटची भेट हिच आपली
प्रत्तेक भेटीत म्हणायचं
घेवून गोड निरोप मग तू
परतीच्या वाटेस लागायचं……।।

परतीच्या वाटेवरती मग
जीव तुझा धड-धडतो
पुन्हा कधी भेट होईल
हाच विचार घुटमळतो
       अश्या वेळी मेंदूने तुझ्या
       काळजावर लगाम घालायचं
       शेवटची भेट हिच आपली
       प्रत्तेक भेटीत म्हणायचं…….।।१।।

कधी आठवणी पाऊस बनून
मनास तुझ्या भिजवून जातात
कधी कोवळ्या उन्हागत
चटके तुला देवून जातात
       त्या आठवणींमध्ये मग
       रमून तू पण हसायचे
       शेवटची भेट हिच आपली
       प्रत्तेक भेटीत म्हणायचं…….।।२।।

कधी भरल्या गर्दीमध्ये
तू मला शोधतेस
असतो मी थोडा आसपास
कसं तू हे हेरतेस
       लपून मग मी चोरून स्वतः
       निघून तेथून जायचे
       शेवटची भेट हिच आपली
       प्रत्तेक भेटीत म्हणायचं…….।।३।।

कळते मला हाक तुझी
मनापासून घातलेली
पुन्हा नव्या भेटीसाठी
राधा माझी पेटलेली
       कान्हाला या भेटायला मग
       राधेनच हो यायचं
       शेवटची भेट हिच आपली
       प्रत्तेक भेटीत म्हणायचं…….।।४।।


-प्रशांत भोपळे
(Date: ५/१/२०१५)

Love | Romantic | Passion| Kavita | Poem

काय बोलू मी

काय बोलू मी की
मस्त तुला वाटेल
जास्त बोललो मी तर
हुंदका तुझा दाटेल……।।

बोलू का मी प्रेम माझं
ढगा एवढं जास्त आहे
तुझ्या डोळ्यातलं जग सखे
माझ्यासाठी मस्त आहे
       तुझ्या डोळ्यात सखे जणू
       पूर्ण आयुष्य कटेल
       जास्त बोललो मी तर
       हुंदका तुझा दाटेल…….।।१।।

बोलू का मी आठवण तुझी
किती मला येते
त्याच आठवणींन मध्ये रोज
रात्र सरून जाते
       झोपलीस तू आज तर
       स्वप्नात तुला भेटेल
       जास्त बोललो मी तर
       हुंदका तुझा दाटेल…….।।२।।

बोलू का मी सागर किणारा
साद रोज देतो
भेटायला तू येशील म्हणून
रस्ता निरखून पाहतो
       मिठीन घेईन तुला जेव्हा
       आपण पुन्हा भेटेल
       जास्त बोललो मी तर
       हुंदका तुझा दाटेल…….।।३।।

बोलू कसं तुझा अबोला
काटा मनावर येतो
तुझं हास्य पाहण्यासाठी
वेडा पिसा होतो
       तेच हास्य पाहण्यासाठी
       मरून परत उठेल
       जास्त बोललो मी तर
       हुंदका तुझा दाटेल…….।।४।।

-प्रशांत भोपळे
(Date: ५/१/२०१५)

Love | Romantic | Passion| Kavita | Poem