गुरुवार, ५ नोव्हेंबर, २०१५

प्रेमाची भाषा

नजरेत नजर देऊन तुझं
तू हळूच नजर चोरायची
प्रेमाची ही भाषा मला
कधीच नाही कळायची…।।

पाहून मला तुझं
उगाच गाली हसणं
चालत पुढे जाता जाता
माग वळून बघणं
       त्या वळून बघण्यामध्ये
       वेगळीच अदा असायची
       प्रेमाची ती भाषा मला
       कधीच नाही कळायची…।।१।।

माझ्यासाठी रोज तुझं
वाट माझी बघणं
कितीही उशीर झाला तरी
कधीच नाही चिडणं
       तुझ्या वाट बघण्यामध्ये
       वेगळीच नशा असायची
       प्रेमाची ही भाषा मला
       कधीच नाही कळायची…।।२।।

हात पुढे करता मी
हाती हात धरायची
विनाकारण कधी कधी
मुठ तू अवळायची
       तुझ्या हाती हात असता
       वेगळीच उब भासायची
       प्रेमाची ही भाषा मला
       कधीच नाही कळायची…।।३।।

घराकडे जाता जेव्हा
वाट परतीची लागायची
"नको ना जावू " अशी
हाक मनातून निघायची
       माझ्या मनाची बैचेनी मग
       मलाच नाही कळायची
       प्रेमाची ही भाषा मला
       कधीच नाही कळायची…।।४।।

प्रेमाची ही भाषा मला
कधीच नाही कळायची…


-प्रशांत भोपळे
(Date:२/११/२०१५)


Tag: Romantic Marathi Poem | Kavita | Love | Passion | Radha Krishna |

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा